काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीला खिंडार; रणजितसिंह मोहिते-पाटलांचा बुधवारी भाजप प्रवेश

0
474

सोलापूर, दि. १९ (पीसीबी) – माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील बुधवारी (दि.२०) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कार्यकर्त्यांनीही त्यांना बिनधास्त भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आज (मंगळवार) अकलूजमध्ये मोहिते-पाटील पितापुत्रांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  या मेळाव्यात मोहिते-पाटील पितापुत्रांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब  करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

या मेळाव्याला सुमारे ५ हजार कार्यकर्त्यांनी  हजेरी लावली होती. उपस्थित कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना बिनधास्तपणे भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.  तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास कार्यकर्त्यांनी मोहिते पाटील यांना दिला आहे.

रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.   विजयसिंह मोहिते पाटील यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीलाही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.