काँग्रेसच्या राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर

0
571

मुंबई, दि. २० (पीसीबी) – काँग्रेसने मंगळवार रात्री उशिरा लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात केरळाच्या २ आणि राज्यातील सात उमेदवार यांची नावे जाहीर केली. मुंबईत दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार व काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून वर्धा लोकसभा मतदारसंघात ज्यांचे नाव सुरुवातीपासूनआघाडीवर होते त्या ऍड. चारुलता टोकस यांनाही काँग्रेसने उमेदवारी देऊन एक सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

शिर्डी या अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उभे करण्यात आले आहे. काँग्रेसने आधी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र या यादीत त्यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसने नंदूरबार या अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघात के.सी. पडावी यांना उमेदवारी दिली आहे. तर धुळे मतदार संघातून कुणाल रोहिदास पाटील यांना उभे केले आहे.