काँग्रेसच्या या माजी मुख्यमंत्र्याविरोधात सीबीआय गुन्हा दाखल करणार

0
681

नैनीताल, दि. ४ (पीसीबी) – माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि कर्नाटकमधील डीके शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचा आणखी एक नेता ‘सीबीआय’च्या रडारवर आहे. २०१६ च्या कथित स्टिंग व्हिडिओप्रकरणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरुद्ध सीबीआय गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती कोर्टात दिली आहे.

सत्तेत राहण्यासाठी आणि सत्तेविरुद्ध बंड करणाऱ्या आमदारांना मुख्यमंत्री हरीश रावत यांनी पैशांची लाच देऊ केली होती. उत्तराखंड हायकोर्टामध्ये सुरू असलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीवेळी तपास पथकाने माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध स्टिंग व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती कोर्टात दिली आहे.

२०१६ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर हा कथित व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत हरीश रावत सत्ता टिकून ठेवण्यासाठी व भाजपात गेलेल्या बंडखोर आमदारांचा पुन्हा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी २० सप्टेंबर रोजी होणार आहे.