Maharashtra

काँग्रेसच्या पहिल्या यादीत विलासरावांची दोन्ही मुले?

By PCB Author

September 22, 2019

मुंबई, दि. २२ (पीसीबी)-  काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव व लातूर शहराचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांचे काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव असून लातूर ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे यांना डावलून विलासराव देशमुखांचे कनिष्ठ पुत्र व जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांचेही नाव नक्की झाल्याची चर्चा माध्यमातून पुढे आली आहे. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांना एकाच वेळी उमेदवारी मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.

काँग्रेस पक्षाची पहिली यादी हाती लागल्याचा विविध वृत्तवाहिन्यातून दावा केला जात असून पहिल्यांदाच राज्यात दोन सख्ख्या भावांना लगतच्या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याचा पहिलाच प्रसंग असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. विलासराव देशमुखांची पकड लातूर तालुक्यावर मोठी होती. त्यांनी आपल्या हयातीत २००९ साली आपला राजकीय वारसा ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला व त्या निवडणुकीत अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ९९ हजार मतांनी विजयी झाले. लातूर ग्रामीण मतदारसंघातून विलासराव देशमुखांनी लोकांमध्ये वावरणारे वैजनाथ शिंदे यांना उमेदवारी दिली व त्यांनी भाजपाचे रमेश कराड यांचा पराभव करत विजय संपादन केला. २०१४ च्या निवडणुकीत लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख यांना उमेदवारी मिळाली त्याचवेळी लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली.

तत्कालीन आमदार वैजनाथ शिंदे यांचे तिकीट डावलले गेले व ऐनवेळी श्रेष्ठींनी त्र्यंबक भिसे या जिल्हा परिषद सदस्यास उमेदवारी दिली. २०१४ च्या निवडणुकीत भिसे यांनी रमेश कराड यांचा पराभव करत विजय संपादन केला.

गेल्या तीन वषार्ंपासून लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख हे उमेदवार राहतील अशी चर्चा सुरू होती. अनेक कार्यक्रमात आमदार त्र्यंबक भिसे यांच्या उपस्थितीतच कार्यकत्रे धीरज देशमुख यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून करत असत. भिसे यांना अवघडल्यासारखे होई.

मांजरा साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह भिसे यांच्या उपस्थितीतच अनेक सभासदांनी केला त्यामुळे भिसे यांचा पत्ता कट होणार या चच्रेला ऊत आला होता.