काँग्रेसच्या गडाला धक्का? अशोक चव्हाण पिछाडीवर

0
301

नांदेड, दि. २३ (पीसीबी) – सुरूवातीच्या कलांमध्ये नांदेडमधून अशोक चव्हाण पिछाडीवर आहेत. महाराष्ट्रतील काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात सरळ लढत आहे. वंचित बहुजन आघाडीनं यशपाल भिंगे यांना उमेदवारी दिली आहे. भिंगे धनगर समाजाचे नेते आहेत. त्यामुळे धनगर समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत.

गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते. स्थानिक स्वराज्य संस्था आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून चव्हाणांची जिल्ह्यावर पकड असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे इतिहासात डोकवल्यास नादेडकरांनी दर १५ वर्षाला येथे धक्कादायक निकाल दिला आहे. इतिहासात डोकावल्यास नांदेडच्या जनतेने अशोक चव्हाण यांनाही पराभवाची चव चाखायला लावल्याचे दिसते. गेल्या पंधरा वर्षांपासून नांदेड मतदारसंघात काँग्रेसचा खासदार राहिला आहे. मात्र, यंदा नांदेडच्या परंपरेनुसार निकाल लागतो की, ही परंपरा खंडीत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर आणि मुखेड यांचा समावेश होतो. यापैकी भोकर, नांदेड उत्तर आणि नायगाव हे ३ मतदारसंघ काँग्रेस, नांदेड दक्षिण आणि देगलूर हे मतदारसंघ शिवसेना आणि मुखेड मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत.