Maharashtra

काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द

By PCB Author

August 29, 2019

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे  माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द केले आहे. याबाबतचे पत्र चतुर्वेदी यांना देण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  सतीश चतुर्वेदी यांचे काँग्रेसने  निलंबन रद्द केले आहे.  या निर्णयाची एक प्रत नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनाही पाठवली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांच्यावर निलंबनाची  कारवाई करण्यात आली होती.

अडीच वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीदरम्यान तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक प्रकरणी सतीश चतुर्वेदी यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप करण्यात आला होता. चतुर्वेदी यांच्या मुलाने अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर चतुर्वेदी यांच्यावरील कारवाई  मागे घेण्यात आली आहे .

याबाबत प्रतिक्रिया देताना चतुर्वेदी म्हणाले की, काँग्रेसपासून कधीही दूर  नव्हतो आणि राहणारही नाही. गेल्या पाच वर्षांपासून पक्षाच्या कामात कधीही खंड पडू दिलेला नाही. कुणावरही  नाराजी किंवा द्वेष  नाही   पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, असे ते म्हणाले.