Maharashtra

काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश  

By PCB Author

September 02, 2019

मुंबई, दि. २ (पीसीबी) – औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघाचे  काँग्रेसचे माजी आमदार  अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (सोमवार) शिवसेनेत प्रवेश केला .  लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तार यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला  होता.  त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरु होती.

सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे सत्तार हे विधानसभेला सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून लढतील,  अशी चर्चा होती.  सत्तार यांनी गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री यांच्याकडे  भाजप प्रवेशासाठी आग्रह धरला होता. परंतु  सत्तार यांना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध होऊ लागला. त्यामुळे सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना पक्षप्रवेशाविषयी  अब्दुल सत्तार म्हणाले की,  गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या पीकविमा, कर्जमाफी सबंधित प्रश्नांवर शिवसेना महाराष्ट्रात काम करत आहे. खरेतर मी काँग्रेसमध्ये असताना ती विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी होती पण ती जबाबदारी सत्तेत असतानाही शिवसेनेने पार पाडली. या गोष्टींमुळे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सत्तार यांनी  सांगितले.  तसेच येत्या काळात पक्ष देईल, ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.