काँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार

0
734

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – महाराष्ट्रासह देशभरातील काँग्रेसचे आमदार आणि खासदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महासचिव, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक घेतल्यानंतर ही माहिती दिली.

राहुल गांधी यांनी केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.  त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे सर्व आमदार आपले एका महिन्याचे वेतन पक्षाकडे जमा करणार आहेत. केरळवर आलेली नैसर्गिक आपत्ती भीषण आहे.  आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

दरम्यान, केरळसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. आम आदमी पक्षानेही केरळसाठी सर्व आमदार, मंत्री आणि खासदारांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केरळला १०  लाख रुपयांची आर्थिक  मदत दिली आहे.