काँग्रेसचा ‘या’ राज्यातील बडा नेता भाजपाच्या गळाला

0
289

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूूमीवर बदलाचे वारे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचा बडा चेहरा असलेले जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद यांनी हाती कमळ घेतलं.

कोणता पक्ष सोडला हे महत्त्वाचे नाही तर कोणत्या पक्षात प्रवेश केला हे जास्त महत्त्वाचं आहे. भाजपमध्ये प्रवेश करणं हा माझा एक विचारपूर्वक निर्णय आहे. जर आज खर्‍या अर्थाने या देशात कोणताही पक्ष असेल तर तो भाजप आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून फक्त एकच आणि एकच भाजप आहे, असं जितीन प्रसाद यांनी म्हटलं आहे.
देशाच्या भविष्यासाठी, कठीण प्रसंगांत जर कोणता पक्ष आणि नेता उभा असेल तर ती भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जर मी माझ्या लोकांच्या हिताचे रक्षण करू शकत नाही तर अशा पक्षात राहण्यात काय अर्थ आहे, असे मला काँग्रेसमध्ये वाटत होते. मी तिथे काहीच करू शकत नसल्याचं जितीन प्रसाद म्हणाले.

दरम्यान, मला ज्या काँग्रेस नेत्यांनी आशिर्वाद दिला त्यांचा मी आभारी आहे. आता मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असंही प्रसाद म्हणाले. भाजपमध्ये येण्यापूर्वी जितिन प्रसाद यांनी गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली होती.