Maharashtra

काँग्रेसचा ‘भारत बंद’; संजय निरुपम, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांना अटक

By PCB Author

September 10, 2018

मुंबई, दि. १० (पीसीबी) – इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज  (सोमवार) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान आंदोलन सुरु होण्याआधीच पोलिसांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना अंधेरी रेल्वे स्टेशनवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   

राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या आंदोलनाला २१ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष,  प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, ‘भारत बंद’मुळे गणेशोत्सवानिमित्त घोषित केलेल्या एसटीच्या विशेष बसगाडय़ा आज (सोमवारी) सकाळऐवजी दुपारी ३ नंतर सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे.