काँग्रेसचा ‘भारत बंद’; राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, शरद पवार रामलीला मैदानावर

0
578

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) –  इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज  (सोमवार) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. देशभरातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर रामलीला मैदानावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोजद प्रमुख शरद यादव यांच्या उपस्थितीमध्ये इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.  

राहुल गांधी सर्वपक्षीय बड्या नेत्यांसह रामलीला मैदानावर विरोध प्रदर्शन करत आहेत. राहुल गांधींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी राहुल गांधींनी राजघाटावर त्यांच्या कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान त्यांनी आणलेले पवित्र जल अर्पण केले. त्यानंतर ते आंदोलनासाठी निघाले.

दरम्यान, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात या बंदचा परिणाम दिसून येत आहे. मुंबईत काँग्रेस नेते संजय निरुपम, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले.