Desh

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिध्द; पाच मोठ्या आश्वासनांची घोषणा

By PCB Author

April 02, 2019

नवी दिल्ली,  दि. २ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने  जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘हम निभाएंगे’   अशी  कॅचलाईन जाहीरनाम्याला देण्यात आली आहे. यात काँग्रेसने ५ महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे ‘हात’ हे चिन्ह  समोर ठेवून पाच मोठ्या आश्वासनाचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे, असे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

दिल्लीतील राहुल गांधी यांनी पक्षाचा जाहीरनाम्याची आज (मंगळवार)  घोषणा केली.  किमान उत्पन्न योजना, रोजगार आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पसह पाच मोठ्या घोषणा या जाहीरनाम्यात  करण्यात आल्या आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील २० टक्के गरिबांसाठी ‘न्यूनतम आय योजना’ अर्थात ‘न्याय’ सुरु करण्याचे  वचन दिले आहे. या जाहीरनाम्याला ‘जन आवाज’  असे नाव दिले आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील  पाच मोठी आश्वासने

१. प्रत्येक वर्षी २० टक्के गरिबांच्या खात्यात ७२ हजार  रुपये जमा करणार.  काँग्रेसने या योजनेसाठी ‘गरीबी पर वार, हर साल ७२ हजार’ चा नारा दिला आहे.

२. २२ लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन  दिले आहे. १० लाख लोकांना ग्रामपंचायतींमध्ये रोजगार देण्याचे वचन दिले आहे. ३ वर्षांपर्यंत तरुणांना व्यवसायासाठी कोणच्याही परवानगीची गरज नाही.

३. मनरेगा योजनेत कामाचे दिवस १०० दिवसांनी वाढवून १५० दिवस करण्याचे आश्वासन

४. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची घोषणा.  तसेच  शेतकऱ्यांनी कर्ज फेडल्यास तो फौजदारीऐवजी दिवाणी स्वरुपाचा गुन्हा समजला जाईल.

५. जीडीपीचा ६ टक्के भाग शिक्षण क्षेत्रावर खर्च केला जाईल. विद्यापीठे, आयआयटी, आयआयएमसह महत्त्वाच्या संस्थांमध्ये गरिबांना सहज प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न  करणार