Desh

काँग्रेसकडून अभिनेत्री करिना कपूर लोकसभा लढवणार ?

By PCB Author

January 21, 2019

भोपाळ, दि. २१ (पीसीबी) – मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांतील विजयानंतर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी  सुरू  केली  आहे. काँग्रेसच्या काही आमदारांनी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून  राजकीय नेत्याला उमेदवारी देण्यात येऊ नये, तर  बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानला उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षाकडे केल्याचे सांगितले जात आहे.

भोपाळ लोकसभा मतदारसंघावर  भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे  करिना कपूरला उमेदवारी दिल्यास तरुणांचा  पाठिंबा मिळू शकतो. तसेच  भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडू शकते. याशिवाय, करिना कपूर ही पतौडी कुटुंबाची सून  असल्याने जुन्या भोपाळमध्ये काँग्रेसला तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो. महिला असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठिंबा मिळेल, असे काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील नेते गुडडू चौहान आणि अनीस खान यांनी म्हटले आहे.

पतौडी कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून भोपाळमध्ये स्थायिक आहे. सैफ, करिना, शर्मिला टागोर आणि सोहा अली खान अनेकदा भोपाळला येऊन देखील गेले आहेत. मात्र, मंसुर अली खान पतौडी यांनी १९९१ मध्ये भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा  पराभव झाला होता. त्यामुळे  करिना आता काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.