Pune

कसबा बिनविरोध नको, पोस्टरबाजीने चर्चा रंगली

By PCB Author

January 16, 2023

चिंचवड मध्ये महाआघाडीचे निवडणूक होण्याचे संकेत

पुणे, दि. १६ (पीसीबी) – चिंचवड मध्ये संभाव्य विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होत चालली आहे. तसेच आता पुणे शहरातील कसबा विधानसभेतसुध्दा निवडणूकच व्हावी म्हणून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

पुण्यातील सर्वाधिक लक्ष असलेला मतदारसंघ आणि पुण्याचे मध्यवर्ती असलेला कसबा मतदारसंघ कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनानंतर अवघ्या पाचच दिवसात पुन्हा एकदा कसबा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरलं.  राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी कसबा मतदार संघातून आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली.  त्यानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी या विषयावर सूचना देऊन पडदा टाकला.

त्यानंतर आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे कारण कसबा पेठीतील महत्वाच्या जागी म्हणजेच शनिवार वाड्याच्या जवळ एक पोस्टर लावण्यात आलं आहे.  या पोस्टरवर “कसबा झालाय भकास, आमदार हवाय झकास’ असं लिहून, शिवसेना फोडली, काँग्रेस-राष्ट्रवादी मधले उमेदवार पळवून नेले. पंढरपूर- कोल्हापुर मध्ये पोट निवडणुकीत उमेदवार उभे केले. अंधेरी पोट निवडणुकीत उमेदवारीच्या नोकरीचा राजीनामा नामंजुर करण्यापासुन ते NOTA पर्यंत गलिच्छ राजकारण केले. अश्या पक्षाला सहानुभूती का दाखवावी ? म्हणुन, कसबा पोट निवडणूक बिनविरोध होण्याला आम्हा कार्यकर्त्यांचा विरोध आहे. असं त्या पोस्टरवर लिहण्यात आलं आहे. तर त्याच्या खाली ‘कसब्याच्या समस्यांना वैतागलेला एक सामान्य कार्यकर्ता’ असं लिहलं आहे.

चिंचवडमध्ये जगताप फॅमिली विरोधात कोण – चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे विधानसभेची जागा रिक्त झाली. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचा प्रयत्न आहे, पण राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना महाआघाडी त्यासाठी तयार दिसत नाही. आजवर पंढरपूर, देगलूर, कागल, मुंबई या पोटनिवडणुकित भाजपने बिनविरोधच्या परंपरेला फाटा देत उमेदवार दिल्याने महाआघाडीचे घटकपक्ष निवडणुकिच्या तयारीला लागले आहेत.

राष्ट्रवादीकडून जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे तसेच शिवसेनेकडून गतवेळी सर्वपक्षीय उमेदवार म्हणून १ लाख ११ हजार मते घेणारे राहुल कलाटे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. पुन्हा एकदा कलाटे यांनी सर्वपक्षीय उमेदवार करण्याच्या हालचाली सुरु आहेत. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्वीन यांना संधी दिली तरच बिनविरोधची शक्यता थोडिफार आहे. भाजपचे चिंचवड विधानसभेचे प्रमुख शंकर यांना उमेदवारी मिळाली तर मात्र प्रसंगी जगताप यांच्या भाऊबंदकीतूनही विरोधातील उमेदावर देण्याच्या हालचाली सुरु आहेत. तसेच  राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघांचा तिथे दावा आहे.