कष्ट आणि गुरुंच्या मार्गदर्शनाचे फळ म्हणजे पदवी प्रमाणपत्र – डॉ. आर.एस.माळी

0
493

पिंपरी, दि.१७ (पीसीबी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील माजी कुलगुरु डॉ. आर.एस. माळी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला.

महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रिडा, सांस्कृतिक  आणि सामाजिक क्षेत्राची देखील जडणघडण होत असते. तसेच अभियंता होण्यासाठी सतत चार वर्ष केलेले कष्ट आणि गुरुजनांचे मार्गदर्शन याचे फळ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मिळणारे पदवी प्रमाणपत्र होय. या कार्यकालात आलेल्या अनुभवानेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो. योग्य दृष्टीकोन ठेवून सर्व सामान्यांना भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी या अनुभवाचा उपयोग करावा, असे मार्गदर्शन माजी कुलगूरु डॉ. आर.एस.माळी यांनी केले.

 डॉ. आर. एस. माळी म्हणाले की, पीसीईटीच्या विश्वस्त मंडळाने केलेल्या मार्गदर्शनामुळे मागील वीस वर्षात पीसीसीओईची ही शैक्षणिक घोडदौड अभिनंदनीय आहे. पीसीसीओईने मागील वर्षात टेडेक्स, केपीआयटी स्पार्कल आणि आयईईई सारख्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होतो त्यामुळे यावर्षी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत वीस पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले हे सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातून पदवी घेऊन गेलेले अभियंते देश परदेशातून नामांकित आस्थापनांमध्ये उच्च वेतन श्रेणी व उच्च पदांवर आहेत आणि संस्थेच्या नावलौकिकात भर घालत आहेत हे आणखी कौतुकास्पद आहे.

विश्वस्त भाईजान काझी म्हणाले की, माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांनी पुढील शंभर वर्षांचा विचार करुन ही संस्था स्थापन केली. येथून पदवी घेऊन गेलेले हजारो अभियंते जबाबदार नागरिक म्हणून कार्यरत आहेत. येथे विद्यार्थ्यांना फक्त अभियंता नाही, तर प्रतिभाशाली, गुणवत्तापुर्ण व सुसंस्कृत नागरिक म्हणून घडविले जाते. या वर्षी संस्थेत विविध शाखांतून चार हजारांहून जास्त विद्यार्था शिक्षण घेत आहेत. त्यांना उच्च मार्गदर्शन व सेवा सुविधा देण्यासाठी संस्थेचे विश्वस्त मंडळ नेहमी प्रयत्नशील असते.

 पीसीईच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष भाईजान काझी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. एन. बी. चोपडे, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट डिन डॉ. शितलकुमार रवंदळे, डॉ. संजय लकडे, डॉ. शितल भंडारी, प्रा. प्रशांत पाटील, समन्वयक प्रा. गफ्फार मोमीन, महाविद्यालयीन परिक्षा अधिकारी प्रा. सुनिल ताडे, प्रा. केतन देसले आणि यशस्वी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.