‘कश्मीरात तिरंगा कसा फडकतो ते पाहू’ असे आव्हान देणारी दुसरी बेडकीण मेहबुबा मुफ्ती – शिवसेना

0
253

मुंबई,दि.२८(पीसीबी) – मुंबईत आजही तिरंगा फडकतोय. म्हणजे हा भाग पाकड्यांचा नाही. जेथे पाकड्यांची मिजास चालते तेथेच तिरंग्याचा अपमान होतो. नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात. खरी मर्दानगी व मर्दानी तेथेच आहे. कश्मीरातून लेह, लडाख बाजूला काढले. त्या लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय ?

कश्मीरात नक्की काय सुरू आहे याबाबत शंकाकुशंकांना खतपाणी मिळणाऱया घटना, घडामोडी रोज घडताना दिसत आहेत. कश्मीरबाबत देशवासीयांच्या भावना तीक्र आहेत. काँग्रेसच्या काळात कश्मीर हातातून गेलेच होते ते भाजपने परत मिळवले हे जे सांगितले जाते ते खरे असेल तर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास विरोध का करण्यात आला? याचे उत्तर देशाला मिळायला हवे.

कश्मीर हा हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग आहे हे सिद्ध करण्यासाठीच मोदी सरकारने ३७० कलम हटवून कश्मीरच्या पायांतील गुलामीच्या बेड्या तोडून फेकल्या. त्याबद्दल सगळ्यांनीच कौतुकाचा वर्षाव केला. ३७० कलम हटवून भारतमातेचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. हे सर्व मोदी व शहा यांचे राज्य दिल्लीत असल्यामुळेच घडले, पण ३७० कलम हटवूनही भाजप कार्यकर्त्यांना चारेक दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही. लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना कश्मीरच्या पोलिसांनी रोखले व बंदी बनवले. हे चित्र काय सांगते? म्हणजेच कश्मीरची स्थिती अजूनही सुधारलेली नाही.

जे बरे दिसत आहे तो फक्त वरवरचा मेकअप आहे. आता कश्मीरातील तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत व त्यांनी ३७० कलम पुन्हा आणण्यासाठी लढा उभारण्याचे ठरवले आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला या बेडकाने तर ‘डराव डराव’ करत असे जाहीर केले की, ३७० कलम पुन्हा आणण्यासाठी आम्ही चीनची मदत घेऊ. हा सरळसरळ राष्ट्रद्रोहच आहे. दुसरी ती बेडकीण मेहबुबा मुफ्ती. तिने तर ‘कश्मीरात तिरंगा कसा फडकतो ते पाहू’ असे आव्हान दिले आहे.

आजही कश्मीरात तिरंगा फडकवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर कसे व्हायचे? ३७० कलम हटविल्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे व लोकांवर बंधने आहेत. लष्कराचा बंदोबस्त पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे. दहशतवादी हल्ल्यांचे भयही जास्त निर्माण झाले आहे. ३७० कलम हटवताच कश्मिरी पंडितांची घरवापसी होईल, पंडितांना त्यांचा जमीनजुमला परत मिळेल असे वातावरण भाजपने निर्माण केले. प्रत्यक्षात किती पंडितांची घरवापसी झाली हे गौडबंगाल आहे. भारतीय जनता पक्षाचे काम करणाऱयांच्या हत्या याच काळात केल्या गेल्या हे दुर्दैव आहे.

३७० कलम असताना बाहेरच्या लोकांना येऊन तेथे एक इंच जमीन घेता येत नव्हती. बाहेरच्यांना तेथे जाऊन उद्योग, व्यापार करता येत नव्हता. त्यामुळे ३७० कलम काढल्यानंतर तेथे व्यापार, उद्योग वाढेल असे चित्र निर्माण केले होते. काही बडय़ा उद्योगपतींनी देशभक्तीने प्रेरित होऊन कश्मीरात मोठी गुंतवणूक करण्याचेही जाहीर केले, पण वर्ष उलटून गेले तरी तेथे एक रुपयाचीही गुंतवणूक होऊ शकलेली नाही. बेरोजगारीने वैफल्यग्रस्त झालेले तरुण पुन्हा जुन्याच अतिरेकी मार्गाने निघाले आहेत व ‘३७०’ प्रेमी पुढारी या तरुणांची डोकी भडकवीत आहेत.