Maharashtra

कल्याण स्थानकावर महिलेचा विनयभंग करणारा आरपीएफ जवान निलंबित

By PCB Author

June 21, 2018

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – कल्याण स्थानकावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरपीएफ जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरपीएफ जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. या व्हिडीओत आरपीएफ जवान स्टेशनवर प्रवाशांची गर्दी असतानाही कोणालाही न घाबरत महिलेला स्पर्श करत होता. इतर प्रवाशांनी आरपीएफ जवानाचे हे कृत्य पाहिल्यानंतर त्याला नुसते थांबवले नाही तर चांगलाच चोप दिला.

एका प्रवाशाने रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओत आरपीएफ कॉन्स्टेबल शेजारी बसलेल्या महिलेच्या पाठीला स्पर्श करताना दिसत आहे. यावेळी काही प्रवासी आणि महिलेच्या नातेवाईकाच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी तात्काळ त्याला विरोध करत रोखले आणि चोप देण्यास सुरुवात केली.

आरपीएफने तात्काळ कॉन्स्टेबल राजेश जहांगीरला निलंबित केले आहे. यासोबत विभागीय चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महिला आपली लहान मुलगी आणि नातेवाईंकांसोबत प्लॅटफॉर्म क्रमांक ४/५ वर एक्स्प्रेसची वाट पहात बसली असताना हा प्रकार घडला होता.