Maharashtra

कल्याणमध्ये पसंत नव्हता म्हणून पत्नीने केला पतीचा खून

By PCB Author

March 12, 2019

कल्याण, दि. १२ (पीसीबी) – पती पसंत नव्हता म्हणून पत्नीने पतीच्या हत्येचा बनाव रचला. त्यानंतर जेवणाव्दारे पतीला विष दिले आणि वायरने गळा आवळुन पतीचा खून केला. ही घटना कल्याण येथील कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडली.

जगदीश साळुंखे (रा. कोळशेवाडी, कल्याण पूर्व) असे हत्या झालेल्या पतीचे नाव असून पोलिसांनी त्याची पत्नी वृषाली हिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश आणि वृषाली यांचे सहा महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. पण जगदीश आवडत नसल्याने वृषाली हिचा सुरुवातीपासून लग्नाला विरोध होता. असे असतानाही तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने डिसेंबरमध्ये त्यांचे लग्न लावून दिले. वृषालीला जगदीश आवडत नव्हता. यातून दोघांचे वाद सुरू होते. ६  मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरात चोर आले होते. त्यांनी माझे पती जगदीशची हत्या केली असा कांगावा करत वृषाली हिने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी नोंद करत जगदीशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत पुढील तपास सुरू केला. शवविच्छेदनाच्या अहवालात जगदिशला विषारी पदार्थ खायला देऊन गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांना हत्या झाल्याचा बनाव करणाऱ्या वृषालीवर संशय आला. त्यांनी वृषालीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने पतीची हत्या केल्याची कबुली दिली.