‘कल्याणचा काटई टोलनाका कायमस्वरुपी बंद करा कारण….’ : मनसेची मागणी

0
266

डोंबिवली, दि.२२ (पीसीबी) : कल्याण-शीळ रोडवरील काटई टोलनाका कायमस्वरुपी बंद करा, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. राजू पाटील यांनी याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांना दिले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी हे पत्र ट्विटरलाही पोस्ट केलं आहे. कल्याण-शीळ रोडवरील काटई टोलनाका कायमस्वरुपी बंद करा, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांना दिले आहे. कल्याण-शिळ रस्ता हा ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्यावर मौजे काटई येथे टोल आकारणी सुरु होती. परंतु सध्या एम.एस.आर.डी.सी.कडून या 21 कि.मी. रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरु असून या रस्त्यासाठी 198 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. रस्त्याचे काम सुरु असल्याने टोल आकारणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

मौजे काटई येथील टोलनाका आता कायमस्वरुपी बंद करावा अशी मागणी होत आहे. कारण 198 कोटी रुपयांच्या रस्त्यासाठी प्रवाशांना भविष्यात टोलचा भुर्दंड लावणे योग्य नाही. महाराष्ट्रात आधीच बऱ्याच ठिकाणी टोलनाके सुरु आहेत. त्यामध्ये अशाप्रकारच्या कमी खर्चाच्या रस्त्यावर टोल आकारणी करणे योग्य होणार नाही. त्यामुळे कल्याण-शिळ रस्त्यासाठी मंजूर असलेल्या निधीची शासनाकडून पुर्तता करुन कायमस्वरुपी टोल बंद करावा, अशी मागणी पाटील यांनी या पत्रात केली आहे.

दरम्यान, ठाणे महापालिकेची आर्थिकस्थिती बिकट झाल्याने बिले स्वीकारणेच ठाणे महापालिकेने बंद केले आहे. शहरात ठेकेदारांच्या माध्यमातून अनेक महत्वाची कामे सुरू असून केलेल्या कामांची बिलेच मिळत नसल्याने कामगारांना पगार देण्यासाठीही पैसे नसल्याने काम करणे देखील कठीण झाले आहे.काही दिवसांपूर्वीच बिले निघत नसल्याने ठेकेदारांनी पालिका मुख्यालयात आंदोलन केले होते. मात्र अद्यापही बिल अदा न झाल्याने आज पुन्हा ठेकेदारांनी आंदोलन करून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान ठेकेदारांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली असून माळवी यांनी आयुक्तां सोबत यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. ठेकेदारांनी खरंच कामे बंद केली तर शहरातील परिस्थिती मात्र बिकट होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, मनसेने ठाण्यातील कोपरीमधील नवीन पुलाला तडे गेले आहेत. या पूलाला काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचं सांगत मनसेने याच पुलावर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आधी मनसे नेत्यांनी या पुलाची पाहणी केली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी देत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. या आंदोलनात महिला आंदोलक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. या पुलाला तडे गेल्याने ठाण्याहून मुंबईला जाणं कठिण झालं आहे. कारण या पुलाची अवस्था अत्यंत वाईट आहे. प्रवासी आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास कसा करतील? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेच या पुलाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.