Others

कलाश्री संगीत मंडळाचा गुरुपूजन सोहळा

By PCB Author

September 21, 2022

सांगवी, दि. २१ (पीसीबी) – कलाश्री संगीत मंडळाचा गुरुपूजन सोहळा नुकताच नटसम्राट निळू फुले, नाट्यगृह, पिंपळेगुरव येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माननीय महापौर माई ढोरे,. टॉक-डी कंपनीच्या सीईओ प्रणाली विचारे, सहआयुक्त पिंपरी चिंचवड मनपा सौ सुषमा गणेश शिंदे,सिने अभिनेत्री चंद्रारामय्या व पं.सुधाकरजी चव्हाण यांच्या शुभहस्ते झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नांदी सादर करून बहादरपणे कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी समूहात वेगवेगळ्या रागांचे गायन करून रसिकांची मने जिंकली. त्यांना हार्मोनियमसाठी सिद्धी ताजणे, श्रावणी विरोकर,श्रेया पोटले,श्रावणी पोटले व सत्यवान पाटोळे यांनी तर तबल्यासाठी विष्णू गलांडे व दशरथ राठोड यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाचा दुसऱ्या पुष्पात विद्यार्थ्यांनी पं.सुधाकर चव्हाण यांचे गुरुपूजन केले. त्यावेळी पं.प्रभाकर पांडव व सौ.विजयमाला सुधाकरजी चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप पं. सुधाकर चव्हाण यांची कन्या व शिष्या सौ.शाश्वती चैतन्य यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग बागेश्रीमधील विलंबित एकतालात “कोण गत भई” मध्य लय तीनतालात “गुंदे लाओरी मालनिया” आणि द्रुत एकतालामध्ये “अपनी करत पकर लिनी बैय्या मोरि” या बंदिशी सादर केल्या तर “बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल” हा अभंग सादर करत भैरवीतील “अवघा एक रंग झाला” या अभंगाने गायनाचा समारोप केला आणि टाळ्यांचा कडकडाटसह रसिकांची वाहवा मिळवली. त्यांना हार्मोनियमसाठी पं.प्रभाकरजी पांडव, तबल्यासाठी श्री.नंदकिशोर ढोरे, पखवाजासाठी ह.भ.प. गंभीरजी अवचार यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमासाठी श्री.जवाहर ढोरे, श्री.शशी सुधांशु, श्री. प्रशांत शितोळे, श्री.सुधीर दाभाडकर व सौ. राणी ढोरे या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालनचे नामदेव तळपे सर यांनी केले तर आभार रघुनाथ राऊत त्यांनी मानली.