Maharashtra

कलम ३७० शी संबंध विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे – पंतप्रधान मोदी

By PCB Author

October 16, 2019

अकोला, दि. १६ (पीसीबी) – महाराष्ट्रातील निवडणुकीचा कलम ३७० शी काय संबंध बोलणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांचे नांव न घेता निशाणा साधला.  

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा भाजपकडून प्रचारात उपस्थित केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजपवर टीका करू लागले आहेत. या टीकेला अकोला येथे जाहीर सभेत बोलताना   मोदी यांनी  विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

मोदी म्हणाले की, कलम ३७० हटवल्यामुळे विरोधक दु:खी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राजकीय स्वार्थासाठी लोक असे बोलत आहेत की, महाराष्ट्रातील निवडणुकीचा कलम ३७० शी काय संबंध? महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम ३७० चा मुद्दा आम्ही उचलतो, त्यावर आक्षेप असणाऱ्यांना माझे सांगणे आहे की जम्मू-काश्मीरचे लोकही भारतमातेचे पुत्र आहेत. सर्व देश जम्मू-काश्मीरच्या देशभक्त नागरिकांच्या पाठिशी आहे. देश तुमच्याकडे पाहतोय, असे मोदी म्हणाले.

महाराष्ट्रात, मुंबईवर हल्ला करुन दहशतवादी शेजारील देशात जाऊन लपत होते. महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवणारे देशाबाहेर कसे पळालेत? असा प्रश्न मोदींनी २०१४ आधी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला. विरोधातील काही लोकांचे या माफीयांशी कसे संबंध आहेत. आता यांचे भ्रष्टाचाराचे पितळ उघडं पडल्याने ते घाबरले आहेत. त्यांना वाटत असेल, ते सुटलेत मात्र प्रत्येक कृत्याचे देश उत्तर मागणार आहे, असा इशारा मोदी यांनी दिला.