कर नाही त्याला डर कशाला?; अरविंद सावंतांनी सुनावला महाजनांना भाजपचा डायलॉग

0
235

पुणे, दि.५ (पीसीबी) : खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महाजन चांगलेच अडचणीत आले असून हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी महाजन यांना चांगलेच टोले लगावले आहेत. कर नाही त्याला डर कशाला? असं सांगत अरविंद सावंत यांनी महाजन यांना थेट भाजप नेत्यांचाच डायलॉग सुनावला आहे.

महाजनांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकून आहे. मला वाटतं ही पोलिसांची कारवाई आहे. महाजन यांनी काही केलं नसेल आणि हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी घाबरून जाऊ नये. राज्यात सत्ताधारी मंडळींवर गुन्हा दाखल झाला किंवा चौकशी झाली तर कर नाही त्याला डर कशाला अशी प्रतिक्रिया देऊन भाजप नेते मोकळे होतात. मला वाटतं ही पोलिसांची कारवाई आहे तर त्याची चौकशी होणारच. कर नाही तर डर कशाला? हे आपल्या नेत्याचं वाक्य महाजन यांनी लक्षात ठेवावं, असा चिमटा सावंत यांनी काढला.

दरम्यान, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहे. काल रात्री गिरीश महाजन यांनी मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाल्याचा वाल्मिकी कसा होतो ते सांगा?
यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांवरही टीका केली. भाजप नेत्यांनी आतापर्यंत अनेक नेत्यांवर आरोप केले. त्याचे पुढे काय झाले? असा सवाल करतानाच बिनबुडाचे आरोप केल्यावर असं होणारच, असा टोलाही त्यांनी लगावला. सोमय्या यांनी आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते लोक भाजपमध्ये गेल्यावर त्यांचा वाल्याचा वाल्मिकी कसा होतो हे आधी सोमय्यांनी सांगावं, नंतर आम्ही बोलू, असंही ते म्हणाले