Maharashtra

कर्मचाऱ्यांना बिन पगारी पाच वर्षांपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा एअर इंडियाचा निर्णय

By PCB Author

July 16, 2020

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – कोरोनामुळे विमान वाहतूक क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला आहे. त्यात आधीच कर्जाच्या ओझ्यामुळे ढबघाईस आलेल्या एअर इंडियाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. याची झळ आता कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सोसावी लागणार आहे. एअर इंडियानं काही कर्मचाऱ्यांना विना पगारी पाच वर्षांपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या मंडळानं एअर लाईन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकानं त्यासाठी परवानगी दिली आहे.

एअर इंडियाच्या या निर्णयाचं एनडीटीव्हीनं वृत्त दिलं आहे. एअर इंडियाच्या मंडळानं एअरलाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मंडळाच्या अध्यक्षांना स्टाफमधील नॉन परफॉर्मिंग कर्मचाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत विना पगारी सक्तीच्या रजेवर पाठवण्याची परवानगी दिली आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांना सुटीवर पाठवायचं यासंदर्भात कंपनीकडून मूल्याकंन केलं जाणार आहे. यात कर्मचाऱ्यांची कामासाठीची उपयुक्तता, कार्यक्षमता, कामाविषयीची गुणवत्ता, कर्मचाऱ्याचे आरोग्य, भूतकाळातील सुट्यांबद्दलचं कर्मचाऱ्याचं रेकॉर्ड कसं आहे, यासह इतर बाबींवर मूल्याकंन केलं जाणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाणार असून, त्यातून कोणत्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवायचं याचा निर्णय घेतला जाणार आहे.

एअर इंडियाच्या मंडळानं परवानगी दिल्यामुळे व्यवस्थापकीय संचालक राजीव बन्सल कर्मचाऱ्यांना विना पगारी सहा महिने किंवा दोन वर्षे अथवा त्यात वाढ करून पाच वर्षांपर्यंत सुटी पाठवू शकणार आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात हे स्पष्ट करण्यात आलं आहे. निर्णयाची घोषणा झाल्यानंतर आता मुख्यालयातील विभागांचे प्रमुख व प्रादेशिक कार्यालयातील प्रादेशिक संचालक कंपनीनं ठरवलेल्या निकषांच्या आधारे प्रत्येक कर्मचाऱ्याचं मूल्याकंन करणार आहे. या याद्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठवण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत या याद्या पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एअर इंडियात तब्बल १३ हजार कर्मचारी कायमस्वरूपी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा महिन्याला खर्च २३० कोटी रुपये इतका आहे.