Maharashtra

“कर्नाटक सीमा भागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत लढत राहू”

By PCB Author

January 17, 2021

मुंबई, दि.१७ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. “बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठी भाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धाराने लढत राहणे, हीच सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” अशा शब्दांत त्यांनी अभिवादन केले.

पुढे अजित पवार असंही म्हणाले कि,“१९५६ मध्ये आजच्याच दिवशी, बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालीन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरु आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीने लढतील” असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच, कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही.” संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, १८ जानेवारी १९५६ रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे दहा सुपुत्र शहीद, तर अडीचशेहून अधिक जण जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या त्या महाराष्ट्रवीरांना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. तसेच, आंदोलनात जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.