कर्नाटक सरकार पाडण्यासाठी येडियुरप्पांनी घेतला जादूगाराचा सल्ला ?

0
998

शिमोगा, दि.१ (पीसीबी) – कर्नाटकमधील आघाडीचे सरकार पाडण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी जादुगाराची मदत घेतल्याची चर्चा दबक्या सुरात सुरू आहे. त्यासाठी ते केरळला गेलेत, असे बोलले जात आहे. मात्र, या अफवा असल्याचे त्यांचे पुत्र आणि शिमोगामधील खासदार बिवाई राघवेंद्र यांनी सांगितले आहे.

कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्या पूर्वी त्यांनी विश्रांती घेतली आहे, असे राघवेंद्र यांनी सांगितले. तर खांद्याच्या दुखण्यावर नैसर्गिक उपचार करण्यासाठी ते केरळला गेले आहेत. ते शुक्रवारी उपचारासाठी निघाले असून ४ डिसेंबरला परत येणार आहेत, असे येडियुरप्पा यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

दरम्यान,  राज्यातील आघाडी सरकार पाडण्याकरीता येडियुरप्पा जादुगाराचा सल्ला घेण्यासाठी केरळला गेले आहेत, असा आरोप काँग्रेस नेत्याने केला आहे. उडुपीतील विश्वासू खासदारासोबत येडियुरप्पा जादुगाराचा सल्ला घेण्यासाठी केरळला गेले. अलिकडेच शिमोगा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत येडियुरप्पांच्या मुलगा राघवेंद्र यांचा विजय झाला. मात्र, मतांचा फरक कमी असल्याने ते जादुगाराचा सल्ला घेण्यासाठी गेले, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार गोपालकृष्ण यांनी केला आहे.