Desh

कर्नाटक: कुमारस्वामींनी खेळलेला ‘हा’ डाव आपल्यावर उलटू शकतो; भाजपची कोंडी?

By PCB Author

July 13, 2019

बंगळुरू, दि. १३ (पीसीबी) – कर्नाटकमध्ये आघाडीच्या अनेक आमदारांच्या राजीनाम्यानंतर राजकीय भूकंप झाला असतानाच, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कुमारस्वामींनी खेळलेला हा डाव आपल्यावर उलटू शकतो, अशी भीती आता भाजपला सतावू लागली आहे.

मी विश्वासदर्शक ठरावासाठी तयार आहे. तुम्ही दिवस आणि वेळ ठरवा, असे कुमारस्वामी यांनी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांना सांगितले. मात्र, अद्याप विश्वासदर्शक ठरावाची तारीख निश्चित झाली नाही. दुसरीकडे कुमारस्वामींनी हा निर्णय घेऊन भाजपला आश्चर्याचा धक्का दिला आहे.

कर्नाटकात सरकार स्थापन करण्यासाठी हवी असलेली एकी विरोधी पक्षाच्या बहुतांश आमदारांमध्ये दिसून येत नाही. कुमारस्वामी सरकारला विश्वासदर्शक ठरावात पराभूत करण्याचा आत्मविश्वास भाजपमध्ये असता तर, त्यांनी आधीच अविश्वास ठराव मांडला असता. त्यांना केवळ संभ्रम निर्माण करून फायदा घ्यायचा आहे, असे कुमारस्वामी यांच्या एका जवळच्या आमदाराने सांगितले. दरम्यान, बंडखोर आमदारांची भेट घेऊन त्यांना विश्वासात घेण्यासाठी काँग्रेसने कुमारस्वामींना पूर्ण सूट दिली आहे. कुमारस्वामींनी बंडखोर आमदारांची भेट घेऊन त्यांना आघाडीत परतण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, भाजपचे कर्नाटकातील प्रभारी पी. मुरलीधर राव आणि जेडीए मंत्री एसआर रमेश यांच्यातील बैठकीनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजप आणि जेडीएस आघाडी करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कुमारस्वामींनी भाजपसाठी सर्व दारे बंद केली आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.