कर्नाटक: आणखी पाच आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अविश्वास प्रस्तावासाठी येडियुरप्पा तयार

0
394

बंगळुरू, दि. १३ (पीसीबी) – कर्नाटकाच्या राजकारणात अद्यापही खळबळ सुरुच आहे. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी परवानगी मागितली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बंडखोर आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, राजीनामा दिलेल्यांपैकी आणखी पाच आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा अविश्वास प्रस्तावासाठी तयार आहेत.

काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि बंडखोर आमदार आनंद सिंह आणि रोशन बेग यांच्यासह पाच आमदारांनी आपले राजीनामे न स्विकारल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी आणि कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना मंगळवारपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला होता.

दुसरीकडे काँग्रेसचे बंडखोर आमदार एमटीबी नागराज हे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेसचे संकटमोचक डी. शिवकुमार यांच्याशी चर्चा केली होती. शिवकुमार यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी म्हटले होते की, त्यांना राजीनामा मागे घेण्याची आग्रही विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर आता सुधाकरराव यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण राजीनामा मागे घेण्याबाबत विचार करु असे म्हटले आहे.