कर्नाटकात कालव्यात खासगी बस कोसळून २५ जणांना जलसमाधी

0
456

बंगळुरू, दि. २४ (पीसीबी) – कर्नाटकातील मांड्या येथे  कावेरी नदीला जोडलेल्या कालव्यात भरधाव बस कोसळून झालेल्या  भीषण अपघातात  २५  जणांना जलसमाधी मिळाली . या अपघाताबाबत  कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी  माहिती दिली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी खेद व्यक्त करताना घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मी मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. या घटनेची चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले.  या अपघाताबद्दल केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनीही शोक व्यक्त केला आहे.

मांड्या जिल्ह्यातून कावेरी नदीला जोडणाऱ्या कालव्यात खासगी बस कोसळल्यानंतर घटना स्थळी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.