कर्नाटकातील एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची शक्यता

0
1023

बेंगळुरू, दि. २६ (पीसीबी) – कर्नाटकात राजकीय अस्थिरतेचे वारे घोंघावू लागले आहे.   सुरुवातीला संख्याबळ, त्यानंतर मंत्रिमंडळ खातेवाटप आणि आता अर्थसंकल्प यावरून नवीन वाद समोर येऊ लागले आहेत. ५ जुलैला अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच राज्यातील अवघ्या चार आठवड्यांचे एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मंत्री आणि आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. त्यामुळे जेडीएस-काँग्रेस आघाडीची सरकार गोची झाली आहे. काँग्रेसचे नाराज नेते चर्चेतून तोडगा काढण्यास तयार नाहीत. काँग्रेसचे बहुतांश नाराज नेते सरकार पाडण्यासाठी भाजपशी संधान साधण्याचा प्रयत्नात आहेत. त्यामुळे कुमारस्वामी सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे, असे वृत्त आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे जेडीएस-काँग्रेस समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत.  उपचारासाठी सध्या ते धर्मशाला येथे गेले असून ते कुणाचेही फोन कॉल घेत नाहीत. मात्र, ते विश्वासू सहकारी एस. टी. सोमशेखर, बी. सुरेश आणि एन मुनिरत्न यांच्या संपर्कात आहेत.  सिद्धरामय्या यांचा अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते नवीन बजेट आणि कुमारस्वामी सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाला समर्थन करत नाहीत, असे दिसून आले होते.