कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना मुंबईत कडेकोट सुरक्षा; शिवकुमार यांना हॉटेलबाहेर रोखले

0
406

मुंबई, दि. १० (पीसीबी) – कर्नाटक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईतल्या पवई येथील रेनिसन्स हॉटेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. शिवकुमार हॉटेल परिसरातही पोहोचले मात्र, त्यांना या आमदारांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले आहे. दरम्यान, आमदारांच्या विनंतीनुसार, हॉटेलबाहेर एसआरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, आपली समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस नेते शिवकुमार मुंबईत येत असल्याची खबर मिळतात बंडखोर आमदारांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनना पत्र लिहून आपल्याला या नेत्यांची भिती वाटत असून आम्हाला त्यांची भेट घेण्याची इच्छा नाही त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये, अशी विनंती केली होती.

आमदारांच्या या विनंती पत्रानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असून रेनिसन्स हॉटेलबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. १० आमदारांनी सुरक्षेची विनंती केल्यानंतर एसआरपीएफ आणि आरएएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत हे देखील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.