कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला- उद्धव ठाकरे

0
977

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – औद्योगिक गुंतवणुकीत नेहमी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला कर्नाटकने मागे टाकल्यावरून शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. गुजरात विकासाचे ‘मॉडेल’ संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून तिथेही गुंतवणूकदारांची संख्या घटली असल्याची त्यांनी म्हटले आहे. कर्नाटकात गेल्या दहा वर्षांपासून बिगर भाजप शासन सत्तेवर आहे व महाराष्ट्र, गुजरातेत भाजपचे ‘मेक इन इंडिया’ राज्य आहे. तरीही या दोन्ही राज्यांची औद्योगिक, आर्थिक घडी विस्कटलेली दिसते. भाजपाच्या विकासाचे अजगरी वेटोळे महागड्या मेट्रोभोवतीच पडले असून काही उद्योगपतींच्या सोयीसाठी ‘अवनी’ नावाच्या वाघिणीस मारले जाते, असा टोलाही त्यांनी लगावला. कर्नाटकने झेप घेतली याचे दुःख नाही, पण महाराष्ट्र का घसरलो याचीच टोचणी असल्याची खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे.

शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून भाजपावर निशाणा साधला. विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी वेळ येताच ते फुटतात. गुजरातेत साडेचार हजार कोटी इतका सरकारी निधी वापरून पटेलांचा पुतळा उभा केला. तसा महाराष्ट्रात साडेतीन हजार कोटी रुपये सरकारी खर्चाने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहणार आहे, पण त्यास मुहूर्त सापडत नाही.

काम कमी व बोलणे-डोलणे जास्त असा प्रकार भाजपशासित राज्यांबाबत दिसत असेल तर विकासाच्या डोक्यावर खिळा मारण्याचाच हा प्रकार आहे. जगभरातील राष्ट्रप्रमुखांना मोदी हे गुजरातेत घेऊन जातात व स्वराज्याचे मार्केटिंग करतात, पण जपानची बुलेट ट्रेन सोडली तर नवा कोणता उद्योग येत आहे. मुंबईतील अनेक व्यापार, मुख्यालये, डायमंड बाजार अहमदाबाद, बडोदा, सुरतला नेले आहेत. मुंबईचे शोषण अनेक मार्गांनी सुरूच आहे. या लुटमारीत मुंबईचे औद्योगिक महत्त्व कमी झाले. समृद्धी महामार्ग, मेट्रो म्हणजे औद्योगिक प्रगती नाही.