कर्णधारपदासाठी ‘या’ तगड्या खेळाडूंमध्ये आता स्पर्धा

0
160

नवी दिल्ली, दि.१२ (पीसीबी) – श्रीलंकेच्या व्हाईट बॉल सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा स्वतंत्र संघ जाणार हे आतापर्यंत निश्चित झाले आहे. कर्णधारम्हणून छाप पाडलेल्या श्रेयस अय्यरचा या मालिकेसाठी कर्णधारम्हणून विचार सुरू आहे. मात्र, अजून त्याच्या तंदुरुस्तीविषयी काहीही समोर आलेले नाही. अशा वेळी कर्णधारपदासाठी शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांच्यात स्पर्धा राहणार असा अंदाज मानला जात आहे.

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय तीन टी २० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. विराट कोहली,रोहित शर्मासारखे प्रमख खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत व्यग्र राहणार आहेत. त्यामुळे या मालिकेसाठी खास व्हाईट बॉल स्पेशालिस्ट खेळाडूंचा संघ भारत पाठवणार आहे.

श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीविषयी अजून निश्चित माहिती नाही. मात्र, शस्त्रक्रीया आणि त्यानंतर पुनवर्सन कार्यक्रम असा एकूण चार महिन्याचा कालावधी खेळाडू पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी लागतो. त्यामुळे अय्यरच्या उपलब्धतेविषयी अजून साशंकता आहे, असे निवड समितीच्या एका सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले. अय्यर तंदुरुस्त झाल्यास कर्णधारपदाची जबाबदारी अर्थातच त्याच्याकडे सोपविली जाईल. पण, अगदीच तो अनुपलब्ध राहिल्यास अनुभवी शिखर धवन आणि मॅच विनर म्हणून ओळख मिळू लागलेला हार्दिक पंड्या यांच्यात स्पर्धा होईल, असे ही हा अधिकारी म्हणाला. अर्थात, अनुभव आणि सातत्याचा विचार करता शिखर धवनचे पारडे जड मानले जात आहे.

हार्दिकला कर्णधार करताना सर्वच बाजूंचा विचार केला जाईल. अलिकडच्या काळात व्हाईट बॉल सामन्यात तो मॅच विनर ठरत आहे. पण, त्याचा समावेश ज्या हेतुने होतो त्या त्याच्या गोलंदाजीचा अलिकडच्या काळात काहीच फायदा झालेला नाही. त्याने गोलंदाजीही फारशी केलेली नाही. भविष्यात हार्दिक मर्यादित षटकांच्या सामन्यातही एक किंवा दोनपेक्षा अधिक षटके टाकू शकणार नाही असे बोलले जात आहे. पाठिच्या शस्त्रक्रियेनंतर तो जुना गोलंदाज हार्दिक राहिलेला नाही. शस्त्रक्रियेपूर्वी तो मध्यमगती गोलंदाजी होता. साधारण तासी १३ कि.मी. वेगाने तो गोलंदाजी करायचा. पण, शस्त्रक्रियेनंतर त्याला हे शक्य झालेले नाही. यामुळेच तो आता फलंदाजीवर आणि मॅच विनर बनण्याकडे अधिक लक्ष देत असल्याची चर्चा आहे.