कर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांशी खोटे बोलत आहे – पंतप्रधान मोदी

0
926

रायबरेली, दि. १६ (पीसीबी) – कर्नाटकमध्ये सत्तेवर आल्यास दहा दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. मात्र, सहा महिन्यांनंतर एक हजार शेतकऱ्यांचीही कर्जमाफी झालेली  नाही. कर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांना खोटे बोलत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी आज (रविवार) येथे  केली.

रायबरेलीत मोदींची जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.

भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन उत्पन्न वाढविण्यासाठी धोरण तयार केले. त्याची अंमलबजावणी  सुरू केली. एमएसपीच्या एका निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना ६० हजार कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने स्वामीनाथ आयोगाचा अहवाल लागू केला. खरीप आणि रब्बीतील २२ पिकाचे भाव निश्चित केले आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

काँग्रेसच्या काळात शेतकरी विम्याचा हफ्ता १५ टक्के घेतला जात होता. भाजप सरकारने पीकविमा योजनेच्या माध्यमातून १ ते ५ टक्केच हफ्ता घेतला. तर ३३ हजार कोटी रुपये पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दिले. ७० वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा विचार जर कोणत्या सरकारने केला असेल, तर तो भाजप सरकारने केला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.