कर्करोगावरील उपचाराला पैसे नसल्याने अखेर `या` विनोदी अभिनेत्याचे निधन

0
370

मुंबई, दि.२४ (पीसीबी) – तामिळ अभिनेते आणि कॉमेडियन थवासी यांचे सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांनी चाहत्यांकडे आर्थिक मदतीसाठी मागणी केली होती. मदुराई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

थवासी यांनी आजवर १४० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कीजहक्कु चीमाईले, अन्नथा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. ते आपल्या पिळदार शरीरासाठी प्रसिद्ध होत. परंतु कर्करोगामुळे त्यांची अवस्था फारच बिकट झाली होती. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आर्थिक मदतीसाठी विनंती केली होती.

“मी गेली अनेक वर्ष कर्करोगाशी लढतोय. माझी सर्व संपत्ती मी उपचारासाठी खर्च केली. आजारी असल्यामुळे गेल्या काही वर्षांत मी कामही केलेलं नाही. परिणामी मी आता आर्थिक संकटात सापडलो आहे. कृपया कोणीतरी मला मदतीचा हात द्यावा. मी आजन्म तुमचा ऋणी राहिन.” अशी विनंती त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली होती. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी थवासींना आर्थिक मदत केली होती.