करोना व्हायरसमुळे इटलीच्या लोंबार्डी शहरात घरा बाहेर पडण्यासाठी द्यावा लागतो पुरावा

0
842
इटली, दि.१४ (पीसीबी) – करोना व्हायरसमुळे इटलीच्या लोंबार्डी शहरात अत्यंत भीषण परिस्थिती आहे. इटलीतील पत्रकार फ्रान्सेस्का बोरी यांनी इंडिया टुडेला जी माहिती दिली, त्यातून अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. करोना व्हायरसमुळे इटलीत आतापर्यंत १ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण २३ टक्क्यांनी वाढले आहे.
स्थानिक रुग्णालयातील एका डॉक्टरला करोनाची लागण झाली आणि तिथून प्रसार झाल्याचे फ्रान्सेस्का बोरी यांनी सांगितले. करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभागात बेडच नाहीत, अशी स्थिती आहे. अनेकांना योग्य उपचार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय अशी माहिती फ्रान्सेस्का यांनी दिली.
“लोंबार्डीमध्ये अतिदक्षता विभागात बेड नाहीयत. अनेकांना या आजाराची लागण झाली आहे. आता करोनाग्रस्तांची मोजणी थांबवण्यात आली असून, चाचणी बंद करण्यात आली आहे. सध्या करोनाचे इथे ३५ रुग्ण असून, काल १६ जणांचा मृत्यू झाला. कोणीही आता आकडे मोजणी करत नाहीय. कारण त्याला काही अर्थ उरलेला नाही तापासाठी लोकांना सामान्य औषधे दिली जात आहेत. “काहीजण तापाचे औषध घेऊन एक-दोन आठवडयात बरे होत आहेत. पण काही तरुण रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. वयोवृद्ध रुग्णांची स्थिती अत्यंत वाईट आहे. आमच्याकडे ऑक्सिजनची सुद्धा कमतरता आहे. त्यामुळे तरुण रुग्णांचा मृत्यू होत आहे.”लोंबार्डीमध्ये फक्त रुग्णवाहिकेच्या सायरनचे आवाज ऐकू येत आहे. काही घरांमधून श्वासोश्वास थांबल्यामुळे रडण्याचे आवाजही येत आहेत. अपुऱ्या ऑक्सिजन टँकमुळे काही मृत्यू झाले आहेत. “दोन दिवसांपूर्नी मी केमिस्टच्या दुकानात गेले होते. तिथे ४२ जण ऑक्सिजन टँकची मागणी करत होते. पण एकही टँक शिल्लक नव्हता” असे तिने सांगितले.
“लोंबार्डीमध्ये लोक घराबाहेर पडले तर आपण बाहेर का आलो आहोत याचे पुरावे द्यावे लागत आहेत. संचारबंदी लागू आहे. तुम्ही खोटे बोलल्याचे आढळले तर तीन महिन्यांसाठी तुम्हाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते.” अशी माहिती  फ्रान्सेस्का बोरी यांनी दिली.