करोनावर ‘ही’ लस प्रभावी नाही; चिनी अधिकाऱ्यांने दिली माहिती

0
463

बीजिंग,दि.१२(पीसीबी) – करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी चीनची लस फारशी प्रभावी नसल्याची कबुली चिनी अधिकाऱ्यांनी दिली आहे. करोना लशींचे प्रभावीपण वाढवण्यासाठी त्यांचे एकत्रिकरण करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. ‘चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’चे संचालक गाओ फू हे चेंगडू शहरातील एका परिषदेत बोलत होते. चिनी लशींचा संरक्षणाचा दर खूप मोठा नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत लशीकरणाच्या प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या लशींचा वापर करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

चीनने आतापर्यंत लशींचे लक्षावधी डोस इतर देशांना पाठवले आहे. यामध्ये इंडोनेशिया, हंगेरी, ब्राझील, मेक्सिको, तुर्की, पाकिस्तान आदी देशांचा समावेश आहे. ब्राझीलमध्ये सिनोवॅक लस प्रभावी असल्याचा दर ५०.४ टक्के इतका आहे. त्या तुलनेत पाश्चिमात्य देशातील फायजरची लस ९७ टक्के प्रभावी आढळली आहे.

चीनकडून पाश्चिमात्य देशांनी तयार केलेल्या लशींवर शंका व्यक्त करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर चीनमधील संस्थेच्या अधिकाऱ्यानेच तेथील लशींबद्दल केलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘वेगवेगळ्या तांत्रिक पद्धतींच्या विविध लशींचा वापर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करता येईल का, यावर आता विचार सुरू आहे,’ असे गाओ यांनी सांगितले. लशींबाबतच्या धोरणातील संभाव्य बदलांचे तपशील त्यांनी सांगितले नाहीत. मात्र, एमआरएनए तंत्राचा उल्लेख त्यांनी केला. पाश्चिमात्य लस निर्मात्यांनी या तंत्राचा वापर करून लशी विकसित केल्या आहेत, तर चीनने पारंपरिक तंत्राचा वापर करून लसनिर्मिती केली आहे.

‘एमआरएनए तंत्रज्ञानाचे मानवतेला असलेले फायदे प्रत्येकाने विचारात घ्यायला हवेत. आपल्याकडे विविध पद्धतीच्या लशी आधीच आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’ असेही गाओ यांनी सांगितले. मात्र, यापूर्वी त्यांनी एमआरएनए लशींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. चीनच्या सरकारी माध्यमांनीही अमेरिकेतील ‘फायझर’ लशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होत. चीनमधील कंपनीने तयार केलेली ‘सिनोवॅक’ ही लस ५०.४ टक्के इतकी प्रभावी असल्याचे ब्राझीलमधील संशोधनातून समोर आले आहे. अमेरिकेतील ‘फायझर’ कंपनीने विकसित केलेली लस ९७ टक्के प्रभावी आहे.