कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण – विलासकाका यांच्यामध्ये दिलजमाई?   

0
1212

सातारा, दि. ७ (पीसीबी) – कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्यामध्ये विळ्या भोपळ्याचे वैर आहे. मात्र, काँग्रेसला बळकटी आणण्यासाठी चव्हाण यांनी विलासकाकांसोबत जुळवून घ्यावे, अशा सुचना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे समजते. त्याचबरोबर विलासकाकांना पक्षात परत घेण्यासाठी काँग्रेसने तयारी दर्शवली आहे. त्याबाबत काँग्रेसमध्ये एकमतही झाले आहे. त्यामुळे आता चव्हाण आणि उंडाळकर यांच्यामध्ये दिलजमाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विलासकाका यांनी काँग्रेसकडून दक्षिण कऱ्हाड मतदारसंघातून ३० वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने दक्षिण कऱ्हाडमधून उमेदवारी दिल्याने विलासकाकांनी नाराजी व्यक्त करून पक्ष सोडला होता. त्यानंतर त्यांनी चव्हाण यांच्याविरोधात विधानसभा लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या बळकटीसाठी काहीही करण्यास तयार आहोत, पण या विषयात पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे म्हटले होते. ते जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल. चव्हाण आणि विलासकाका यांचे  मनोमिलन व्हावे, ही आपली इच्छा आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले होते.