Maharashtra

करन जोहरच्या दोन नोकरांना कोरोना

By PCB Author

May 26, 2020

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : कोरोना कोणाला सोडत नाही. श्रीमंत-गरिब, उच्च-निच असा भेद नाही. राज्या मंत्रीमंडळातील जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज मंत्री महोदयांना कोरोनाने पछाडले. आता चित्रपट निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या घरापर्यंत ‘कोरोना’ पोहोचला आहे. जोहर कुटुंबाकडे घरकाम करणाऱ्या दोघा सदस्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. करण जोहरने सोमवारी संध्याकाळी याविषयी अधिकृत माहिती जाहीर केली. करणची राहती इमारत सध्या सील करण्यात आली आहे. दरम्यन, स्वतः करन जोहर मनातून हादरला आहे.

“कोरोनाची लक्षणे लक्षात येताच, त्यांना आमच्या इमारतीत एका ठिकाणी विलग ठेवण्यात आले होते. बीएमसीला याविषयी ताबडतोब माहिती देण्यात आली. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी इमारतीचे निर्जंतुकीकरण केले. दोघांनाही उत्तम उपचार मिळतील आणि ते लवकर बरे होतील” अशी हमी करण जोहरने दिली.

आपले कुटुंब आणि घरातील बाकीचे सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, असेही करणने सांगितले. करण आपल्या मातोश्री हिरु जोहर आणि दोन मुले यश आणि रुही यांच्यासह राहतो.

“आम्ही सर्वांनी स्वॅब टेस्ट केली. तिचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, मात्र खबरदारी म्हणून पुढील 14 दिवस आम्ही स्वत:ला होम क्वारंटाईन करत आहोत. अधिकाऱ्यांच्या आदेशांचे आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोत” असंही तो म्हणाला.