कमळ आता राजस्थानात सुरू

0
319

देश, दि. १२ (पीसीबी) – तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील सत्तेवरून पायउतार व्हावं लागलेल्या काँग्रेससाठी राजस्थान नवी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत. राजस्थानमधील सत्तेला राजकीय हादरे जाणवू लागल्याचं दिसत आहे. काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून घोडेबाजाराचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या असून, उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमधील राजकीय पॅटर्नची राजस्थानातही पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदारही भाजपात दाखल झाल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात येऊन कोसळलं. त्यानंतर भाजपानं मध्य प्रदेशातील सत्तेची सूत्र हाती घेतली. या घटनेला तीन महिने लोटत नाही, तोच राजस्थानातही अस्थिरतेचे हादरे जाणवू लागले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर काल (११ जुलै) राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांना घेऊन दिल्लीला गेले. या आमदारांना हरयाणातील गुरुग्रामध्ये एका रिसॉर्टवर ठेवण्यात आलं आहे. शनिवारी रात्री आमदार ‘आयटीसी हॉटेल ग्रॅण्ड’मध्ये दाखल झाल्यानंतर हरयाणा पोलिसांच्या हॉटेल बाहेरील हालचाली वाढल्याचं वृत्त आहे. त्याचबरोबर हे आमदार हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती आधीपासूनच मिळाली होती. त्यामुळे यंत्रणा आधीच सर्तक झाली होती.

मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये वर्चस्वावरून धुसफूस सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अविश्वास असल्याचं बोललं जात असून, त्यामुळे सचिन पायलट हे नाराज असल्याचं समजतं.

महाराष्ट्राची मुहूर्त ऑक्टोबर मध्ये –
भाजपने कर्नाटक मधून ऑपरेशन कमळ सुरू केले. कर्नाटकाचा प्रयोग यशस्वी होताच त्याच धर्तीवर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे अल्पमतातील सरकार घालवले आणि पुन्हा भाजपचे शिवराजसिंह मुख्यमंत्री झाले. आता तिसऱ्या टप्प्यात राजस्थान हे टार्गेट आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची नाराजी ओळखून त्यांना बळ द्यायचे आणि अशोक गेहलोत यांचे सरकार पाडायचे अशी भाजपची व्युहरचना आहे. ऑपरेशन कमळ साठी महाराष्ट्र हे टार्गेट आहे, पण ते आणखी चार-सहा महिन्यांनी सुरूवात होईल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रसमध्ये धुसफूस आहे. काँग्रेसचे मंत्री आम्हाला कुठेही विश्वासात घेतले जात नाही म्हणून नाराज आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आले, असा निष्कर्ष काढून आघाडी सरकार पाडायचे अशी भाजपची व्युहरचना आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय अन्य नेतृत्व असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर यायला तयार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रसंगी नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर अथवा अंतिम पर्याय म्हणून चंद्रकांत पाटील यांचे नाव पुढे करून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असे सरकार बनविण्याच्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या मुलाखतीत भाजप बरोबर सरकार बनविण्याची बोलणी नाहीत, असे दै. सामना ला दिलेल्या मुलाखतीत अगदी निक्षू सांगितले. राजकीय वर्तूळात त्या विधानावर मतमतांतरे आहेत. ऑक्टोबर च्या दरम्यान महाराष्ट्रातील आघाडी सरकार गडगडेल असे बोलले जाते.