कमळजाई (नीरा) सुळक्यावर नवा मार्ग खुला करत 15 वर्षीय चेलुवी ढोकले हिने केली चढाई

0
401

जुन्नर, दि. १९ (पीसीबी) – प्रस्तरारोहणात अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या, निखळणारे दगड व माती मिश्रित 130 फूट उंच कामळजाई- नीरा सुकळ्यावर वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी स्वतःच्या वेगळ्या मार्गाने चढाई करून सर्वात तरुण महिला गिर्यारोहक बनण्याचा मान चेलुवी हिने मिळविला.
चेलुवीने या आधी तैलबैला, काळकराई, लिंगाणा सुळका, तसेच सिंहगडावर यशस्वी चढाई केलेली आहे. त्याचबरोबर राज्यस्तरीय व राष्ट्रीय गिर्यारोहण स्पर्धेत यश मिळवून 2018 साली बँकॉक येथे झालेल्या आशियाई कृत्रिम प्रस्तरारोहन स्पर्धे साठी भारताकडून तिची निवड झाली होती.

जुन्नर तालुक्यातील जीवधन- नाणेघाट भागातील फांगुळ गव्हाण गावा नजीक, कामळजाई- नीरा या सुमारे 130 फूट उंच सुळक्यावर , एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरींग क्लबच्या 14 गिर्यारोहकांनी एकाचवेळी दोन बाजूने चढाई करण्याची दुहेरी मोहीम आयोजित केली होती. त्यात चेलुवी ने नवीन मार्ग खुला करत ही कामगिरी केली व अवघ्या 2 तासात पिटोन, मेखा, व इतर नैसर्गिक साधनांचा वापर करून चढाई पूर्ण केली.
तर दुसऱ्या व पारंपरिक मार्गावरून गौरव लंघे याने चढाईला सुरवात केली, पहिल्या 45 फूट चढाई नंतर सचिन शहा याने चढाई केली. व पुन्हा शेवटची 30 फूट चढाई करत गौरव लंघे याने दुपारी 1:30 ला सुळक्याचा माथा गाठला.

माउंट एव्हरेस्ट व कंचनगंगा शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरींग क्लब च्या संघाने ही कामगिरी केली. मोहिमेत चेलुवी ढोकले, वय (15 वर्षे) गौरव लंघे, धनराज साळवी, सचिन शहा, ओंकार बुरडे, सुरेश पाटील, ओम पाटील, हरीश पाटील, हिमांशू ढोकले, रुद्राक्षी मोहिते (वय 13 वर्षे), मालोजी ढोकले, (वय 10 वर्षे). शिवम पाटील.(वय 12 वर्षे) स्वयम पाटील यांनी सहभाग घेतला.
अशी माहिती संस्थेचे कार्यवाह कृष्णा ढोकले यांनी दिली