कमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

0
642

भोपाळ, दि. १४ (पीसीबी) – मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष  कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. गुरूवारी रात्री उशीरा काँग्रेसने ट्विटरद्वारे कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचे जाहीर केले. शनिवारी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्रीपद नसेल असेही सांगितले जात आहे. मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात जोरदार चूरस होती, मात्र पहिल्यापासूनच कमलनाथ यांचे नाव आघाडीवर होते. पण नेतृत्वाचा प्रश्न राज्यात सुटू न शकल्याने अंतिम निर्णय हायकमांडवर सोपवण्यात आला होता. त्यानुसार आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतले. शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना अखेर माघार घ्यावी लागली.