Pimpri

कबुतरखान्यास आग लावून कबुतरे जाळली; तोडफोड, दगडफेक, खुनी हल्ला केल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा

By PCB Author

November 30, 2021

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – कबुतरबाजीवरून झालेल्या भांडणानंतर 14 जणांच्या टोळक्‍याने 14 वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर घरावर दगडफेक केली. कोयता, तलवारीने वार करून दोघांवर प्राणघातक हल्ला केला. कबुतरखान्याला आग लावून कबुतरांना जीवे मारले. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री साडेनऊ वाजता आझाद मित्र मंडळ, साई पार्क दिघी येथे घडली.

रूषीकेश नवनाथ वाळके (वय 22, रा. आझाद हिंद मित्र मंडळाजवळ, साईपार्क, दिघी) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्जुनसिंग, संग्रामसिंग बाधा, अभिजित घोरपडे, सुरजितसिंग बाधा, करणसिंग, सोन्या, गजलसिंग बाधा, हुकूमसिंग बाधा, अजयसिंग टाक आणि त्यांचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी वाळके हे आपल्या घरात होते. त्यावेळी त्यांना आरडा-ओरडा आणि तोडफोडीचा आवाज आला. काय झाले हे पाहण्यासाठी ते घराबाहेर आले असता अर्जुनसिंग, अभिजित घोरपडे, संग्रामसिंग यांनी फिर्यादी वाळके यांच्या हातावर आणि डोक्‍यावर कोयत्याने वार करून खूनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिक सैरावैरा पळू लागले. त्यानंतर इतर आरोपींनी याच परिसरात राहणाऱ्या दिगंबर घनश्‍याम पाटील यांच्यावर तलवारीने हल्ला केला. तसेच आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये विशाल तात्या मासाळ हे गंभीर जखमी झाले.

त्यानंतर आरोपींनी हातातील कोयता, तलवार आणि दगडाने परिसरातील सहा दुचाकी, दोन टेम्पो, दोन मोटारी, दोन मिनीबस एक रिक्षा आणि एक बस अशा एकूण 14 वाहनांची तोडफोड केली. तसेच या परिसरात असलेल्या कबुतर खान्यालाही आरोपींनी आग लावून दिली. यात कबुतरखान्यातील कबुतरे मरण पावली.

पोलिसांनी सुरजीतसिंग गजलसिंग बाधा, संग्रामसिंग गजलसिंग बाधा, गजलसिंग नथुसिंग बाधा, अजयसिंग सोनूसिंग टाक या चौघांना ताब्यात घेतले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.