कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील सात जण कोरोना बाधित

0
263

भिवंडी, दि. १० (पीसीबी) : भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांच्यासह कुटुंबतील एकूण सात जणांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. खासदार कपिल पाटील हे हायवे दिवे येथील निवासस्थानी येथे एकत्र कुटुंबात आपला मुलगा व तीन पुतणे यांसह वास्तव्यास आहेत. गावात मदतकार्य करत असताना कपिल पाटील यांच्या पत्नी यांना कुटुंबात सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पाटील यांच्या कुटुंबात खासदार कपिल पाटील, मुलगा, मुलगी, सून व त्या सोबतच एक पुतण्या व दोन सूना असे एकूण आठ जण कोरोना बाधित आढळून आले. या सर्वांवर उपचार सुरू आहे तर खासदार कपिल पाटील यांना सौम्य लक्षणे असल्याने ते सध्या घरात क्वॉरंटाईन असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. कुटुंबातील सर्वांची प्रकृती ठीक असून काळजीचे कारण नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चाललाय. यातून आता लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण होत आहे. काही नेत्यांना तर कोरोनामुळे आपला जीव गमावला लागला. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना काळात नागरिकांना मदत करण्यासाठी ते प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांना देखील नांदेडमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर मुंबईत उपचार झाले आणि नंतर डिस्चार्ज मिळाला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या सह त्यांचे सचिव, पीए आणि काही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा झाली. ते देखील कोरोनावर मात करुन बाहेर आले. एक खासदार, आठ आमदार असंख्य नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना बाधित पोलिसांची संख्या सुमारे ५ हजारावर आहे.