Desh

कन्हैया कुमारसह इतरांवरील देशद्रोहाच्या गुन्ह्याबाबत अद्याप निर्णय नाही – केजरीवाल

By PCB Author

September 06, 2019

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – कथीत देशविरोधी घोषणाबाजीप्रकरणी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) तत्कालीन विद्यार्थी नेता कन्हैया कुमारसह इतर नऊ जणांविरोध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने पोलिसांना देशद्रोहाचा खटला चालवण्याची परवानगी नाकारल्याच्या माध्यमांमधून आलेल्या बातम्या या केवळ अफवा आहेत, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

केजरीवाल म्हणाले, “हे प्रकरण राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील आहे. पोलिसांनी सादर केलेल्या चार्जशीटच्या आधारेच गृहमंत्रालय यावर निर्णय घेणार आहे. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की, या प्रकरणी गृहमंत्रालयावर आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणि इतर कुठल्याही स्वरुपाचा दबाव असणार नाही. गृहमंत्रालय जो पण निर्णय घेईल तो पुराव्यांच्या आधारावर असेल.”

दरम्यान, माध्यमांमध्ये या बातम्या येत होत्या की, केजरीवाल सरकार जेएनयूमध्ये कथीत देशविरोधी घोषणाबाजीप्रकरणी देशद्रोहाचा खटला चालवण्याची परवानगी दिल्ली पोलिसांना देणार नाही. तसेच दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी या प्रकरणी आपले मत मांडताना म्हटले आहे की, पोलिसांनी जे पुरावे सादर केले आहेत. त्यानुसार, कन्हैया कुमार, उमर खालिदसह अन्य आरोपी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा खटला तयार होत नाही.

या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर भाजपाने दिल्ली सरकारवर टीका केली होती. दिल्लीचे भाजपाध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटले होते की, आजचा दिवस काळ्या अक्षरांमध्ये लिहिला जाईल जेव्हा एका मुख्यमंत्र्याचे विश्लेषण केले जाईल. त्यांना देशद्रोह आणि देशभक्त यांच्यामधील फरक माहिती नाही. आम्ही या संदर्भात पुर्ण पुराव्यांनिशी पत्रकार परिषद घेऊ.