कन्हैयाकुमार, दिग्विजय सिंहनंतर जितेंद्र आव्हाड संघाच्या निशाण्यावर!

0
386

ठाणे, दि. १३ (पीसीबी) – कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघात भाजपच्या हालचाली वाढल्या असून संघाचे एक हजार स्वयंसेवक  सक्रीय झाले आहेत.

कळव्यातील ब्राह्मण सभेच्या सभागृहात त्यासाठी नुकतीच एक बैठकही  घेण्यात आली. त्यासाठी भाजपचे प्रदेश संघटक आणि संघाचे माजी पदाधिकारी विजय पुराणिक उपस्थित होते.  तर या मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुकुंद किणी यांच्या घरी चहापानही केले. यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या धोरणाविरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली होती.  लोकसभेच्या निवडणुकीत कन्हैयाकुमार, दिग्विजय सिंह यासारख्या संघ विरोधकांचा ज्या पद्धतीने पराभव केला.  त्याच पध्दतीने आव्हाड यांचाही पराभव करण्यासाठी संघाने  हालचाली  गतीमान केल्या आहेत.