कणकवलीत भाजपचे संदेश पारकर आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

0
739

कणकवली, दि. ५ (पीसीबी) – कणकवलीत भाजपचे युवा नेते संदेश पारकर आणि स्वाभिमान पक्षाचे नेते व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज (बुधवार) राडा  झाला. पारकर यांच्या घराबाहेर दुचाकींची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कणकवलीतील महाविद्यालयाच्या  मैदानावर दोन गटांमध्ये वाद  होऊन राडा झाला. यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे आणि संदेश पारकर यांच्या गटापर्यंत हा वाद पोहोचला. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जुंपल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.  तसेच पारकर यांच्या निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामटतेकर, स्वाभिमान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री व यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पारकरांच्या घरी भेट देऊन   विचारपूस केली. या दोन्ही गटात नगरपंचायत निवडणुकीपासून वाद सुरु  असून त्याचे पडसाद आज झालेल्या वादात उमटले.