कठुआ या ठिकाणी ८ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची क्रूर पणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाची दखल आता संयुक्त राष्ट्रांनीही घेतली आहे. या प्रकरणातल्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका आता संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनो गेटर्स यांनी मांडली आहे. कठुआ प्रकरण हे अत्यंत भयंकर आहे. यातल्या नराधमांना शिक्षा झालीचे पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना कठोर शासन केले गेलेच पाहिजे आणि पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे असे गेटर्स यांनी म्हटले आहे.

कठुआमधील आठ वर्षांच्या आसिफा या चिमुरडीची नराधमांनी बलात्कारानंतर हत्या केली होती. आसिफाला तिच्या कुटुंबीयांनी दत्तक घेतल्याचे समोर आले आहे. आसिफाचे वडिल सांगतात, मी आसिफाला बहिणीकडून दत्तक घेतले होते. ती तीन महिन्यांची होती आणि माझ्या दोन मुलींचा अपघातात मृत्यू झाला. म्हणून मी तिला बहिणीकडून दत्तक घेतले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना भारतात घडल्यानंतर याप्रकरणी अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींनी पीडित मुलीला न्याय मिळावा अशी भूमिका घेत सोशल मीडियावरही मोहीम राबवली.

कठुआ आणि उन्नाव या दोन ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. मुस्लिम समाजाच्या या मुलीवर मंदिरात आठ दिवस बलात्कार झाला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाने आपला देश हादरला. तर काँग्रेसने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत पंतप्रधान या प्रकरणी गप्प का असा प्रश्न विचारला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठुआ आणि उन्नाव प्रकरणातल्या नराधमांना मुळीच माफ करणार नाही असे म्हटले आहे. या आरोपींना कठोरातले कठोर शासन होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. देशभरात या सगळ्या प्रकरणाचे पडसाद उमटलेले असतानाच आता संयुक्त राष्ट्रांनीही याची दखल घेत या प्रकरणातल्या आरोपींना कठोरातले कठोर शासन व्हावे आणि पीडित मुलीला न्याय मिळावा असे म्हटले आहे. या मुलीच्या वडिलांनीही नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.