कठुआ बलात्कार प्रकरणातील पीडितेचे पार्थिव दफन करण्यास ग्रामस्थांचा विरोध

0
889

कठुआ बलात्कार प्रकरणातील पीडितेचे पार्थिव दफन करण्यास हिंदू ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कठुआत अल्पसंख्याक बकरावाल समाज आणि हिंदूमध्ये वाद असून या वादातूनच हिंदू ग्रामस्थांनी दफनविधीसाठी जागा उपलब्ध करुन दिली नाही, असा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

कठुआत जानेवारीमध्ये आठ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून नराधमांनी केलेले अत्याचार आरोपपत्रातून समोर आले आहे. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी माध्यमांना या संपूर्ण घटनाक्रमावर प्रतिक्रिया दिली. ‘हिंदू ग्रामस्थांकडून आम्हाला नेहमीच अपमानास्पद वागणूक दिली जाते. आम्हाला गावाबाहेर काढण्यासाठी आमच्या मुलींशी असभ्य वर्तन केले जाते, असा आरोप बकरावाल समाजाने केला आहे.

‘माझ्या नातीचा मृतदेह सापडला त्यादिवशी काही हिंदू ग्रामस्थांनी गावात दफनविधी करण्यास विरोध दर्शवला. ग्रामस्थांच्या विरोधामुळे आम्ही बराच वेळ थांबून होतो. शेवटी आम्हाला गावात दुसऱ्या ठिकाणी पार्थिवाला दफन करावे लागले, असे तिच्या आजोबांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. ‘आमच्या समाजाचे जे कब्रस्तान आहे ती जागा वादग्रस्त आहे आणि यामुळे हिंदू ग्रामस्थांनी कट रचून आम्हाला मुलीचे पार्थिव दुसऱ्या ठिकाणी दफन करण्यास भाग पाडले, असा आरोप तिच्या आजोबांनी केला. माझ्या नातीची पाशवी अत्याचारानंतर हत्या करण्यात आली. या घटनेनंतरही आम्हाला गावात सन्मानाने वागणूक मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

आमची मुलगी धाडसी होती. जंगलात गेलेला आमचा घोडा परतला, पण आमची मुलगी नाही आली, हे सांगताना तिच्या कुटुंबीयांना अश्रू आवरता आले नाही.