भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकाऱ्यांची सोमवारी (दि. २) आढावा बैठक घेतली. चार दिवसांपूर्वी मोशीतील कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. कचरा डेपोला पुन्हा आग लागू नये, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

या बैठकीला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक अॅड. नितीन लांडगे, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, सह शहर अभियंता अय्युबखान पठाण, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, अग्निशामक अधिकारी किरण गावडे, आरोग्य अधिकारी मनोज लोणकर आदी उपस्थित होते.

बैठकीबाबत माहिती देताना आमदार लांडगे म्हणाले, “शहरातील कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पुढील महिन्यात या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होईल. या प्रकल्पात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे दररोजचा कचरा नष्ट होईल. हा प्रकल्प संपूर्ण शहराचा प्रकल्प आहे. या प्रकल्पावरून कोणीही राजकारण करू नये.

मोशी येथील कचरा डेपोला नुकतीच लागलेली आग वाढत्या तापमानामुळे लागली होती. अशा पद्धतीने पुन्हा कचऱ्याला आग लागू नये, यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मोशी व कुदळवाडी परिसरात वारंवाग आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे मोशी परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्याची सूचनाही प्रशासनाला केली आहे. अग्निशमन दल सुसज्ज करण्यासाठी आवश्यक वाहने आणि मनुष्यबळ वाढविण्यासही आयुक्त हर्डीकर यांना सांगितले आहे.”