Banner News

कंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन” – अजितदादा पवार

By PCB Author

December 08, 2018

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळावे घेण्याऐवजी स्वयंरोजगार मेळावे आयोजित करण्यात यावेत. त्यातून कर्तबगार तरूणांना स्वतःचे रोजगार सुरू करण्यासाठी मदत करावी. ज्यादिवशी नोकऱ्या उपलब्ध असलेल्या कंपन्या जास्त आणि नोकरी मागणाऱ्यांची संख्या कमी होईल, तेच अच्छे दिन असतील, असे प्रतिपादन आमदार अजितदादा पवार यांनी शनिवारी (दि. ८) व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात आयोजित नाना काटे जॉब फेअरचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शीतल काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्यासह राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार अजितदादा पवार म्हणाले, “शरद पवार यांनी नेहमी उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीतूनच हिंजवडीत आयटी पार्क उभारण्यात आले. त्याठिकाणी हजारो जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे साहेबांचा भर युवकांनी रोजगार करण्यापेक्षा उद्योजक बनून रोजगार देण्यालायक बनावे. तरूणांनी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा छोटे-मोठे उद्योजक व्हावे. त्यामुळे या रोजगार मेळाव्यात एखाद्याला नोकरी लागली नाही, तर त्यांनी निराश होऊ नये. भारतरत्न व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि महानायक अमिताभ बच्चन यांनाही सुरूवातीला नोकरी नाकारण्यात आली होती. या दोघांनीही नंतर आपल्या आयुष्यात यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कंपन्यांसाठी मेळावे घेण्याची आवश्यकता आहे. रोजगार मेळाव्याऐवजी स्वयंरोजगार मेळावे आयोजित करावेत. कर्तबगार तरूणांना स्वतःच्या कष्टावर रोजगार सुरू करण्यासाठी मदत करावी. अशा तरुणांना शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांचे मार्गदर्शन घडवून आणावे. ज्यादिवशी कंपन्या जास्त आणि नोकरी मागणाऱ्यांची संख्या कमी होईल, तेच अच्छे दिन असतील, असे त्यांनी सांगितले.”